Prithviraj Chavan Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढलेला असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जागावाटपाबद्दल एक मोठं विधान केलं आहे. मित्रपक्षाने आपला आकडा वाढवण्याच्या नादात जे उमेदवार दिले आहेत, ते अजिबात निवडून येण्याची शक्यता नाही, असे पृथ्वारीज चव्हाण म्हणाले.
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल भाष्य केलं.
मित्रपक्षाने चुकीचे उमेदवार दिले -पृथ्वीराज चव्हाण
"जिथे काँग्रेसचा दावा होता, तिथे मित्रपक्षाने अगदीच चुकीचे उमेदवार दिले आहेत. आणि आपला एकूण आकडा वाढवण्याच्या नादामध्ये... त्या उमेदवारांची अजिबात निवडून येण्याची शक्यता नाही, असे ते उमेदवार पुढे आले आहेत. कुठल्या पक्षाचे त्याबद्दल मी बोलणार नाही", असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार बंडखोर झालेले आहेत का? झाले आहेत. दोन-तीन उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहेत, जिथे काँग्रेसचा बंडखोर उमेदवार सहज निवडून येईल. पण, आता पुढे काय होईल माहिती नाही."
वाटाघाटीमध्ये कोणत्या चुका झाल्या? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
"वाटाघाटींमध्ये चुका झाल्यात. दोन गोष्टींमध्ये चुका झाल्या. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांच्या नेत्यांना वाटाघाटीसाठी पाठवले. ते स्वतः प्रचाराला मोकळे राहिले. आमच्याकडे सगळेच स्वतः वाटाघाटीसाठी आले. रस्त्यावर कोणीच नव्हतं", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
"काँग्रेस पक्षाने अंतर्गत बसून, गांभीर्याने चर्चा करून जागावाटपाबद्दल भूमिका ठरवायला पाहिजे होती. सुरूवातीला अवास्तव भूमिका मांडली, म्हणजे हे पण चांगलं; ते पण चांगलं. पण, चर्चेला गेल्यावर ते झालं नाही. वाटाघाटीमध्ये आम्ही कमी पडलो हे मान्य करतो. पण, फार चुका झाल्या असं नाही. पहिली यादी फार चांगली होती. दुसऱ्या यादीमध्ये तडजोडीमध्ये कमी झालं. पण, एकंदरीत मला वाटतं की आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या का, तर हे व्यावहारिक नव्हतं", असे सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी वाटाघाटातील चुका अधोरेखित केल्या.