Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, आता तिसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले असताना काँग्रेसने 4 उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर हरियाणातील गुरुग्राममधून ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी (30 एप्रिल) चार उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने तीन राज्यांतील चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. हरियाणातील गुरुग्राममधून अभिनेते राज बब्बर, हिमाचल प्रदेशच्या कांगडा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून सतपाल रायजादा यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, उत्तर मुंबईतून भूषण पाटील काँग्रेसचा उमेदवार असतील. पाटील यांचा सामना भाजपचे ज्येष्ठ नेते पीयूष गोयल यांच्याशी असेल.
या जागांवर मतदान कधी होणार?हरियाणाच्या गुरुग्राम जागेसाठी निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात, म्हणजेच 25 मे रोजी मतदान होणार आहे. याशिवाय हिमाचलच्या कांगडा आणि हमीरपूर या जागांवर सातव्या टप्प्यात, म्हणजेच 1 जून रोजी मतदान होईल, तर महाराष्ट्रातील उत्तर मुंबई मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात, म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे.