Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसच्या २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पाठोपाठ काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये भुसावळ, वर्धा, अकोट या मतदारसंघांचा सुद्धा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु असून हळूहळू बैठकानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. त्यानुसार काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रचाराला वेग येणार असून उमेदवारांना पुढची दिशा ठरवता येणार आहे.
सुरुवातीला ४८ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने पुन्हा २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या यादीमध्ये विदर्भातील जागांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघातून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भंडारा येथून पूजा ठवकर तर अर्जुनी मोरगाव येथून दिलीप बनसोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमगावमध्ये विद्यमान आमदारां ऐवजी राजकुमार पुरम यांना उमेदवारी मिळाली आहे. तर राळेगावमध्ये माजी मंत्री वसंत पुरके यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे नागपूर दक्षिण या मतदारसंघाबाबतही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. ती जागा अखेर काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसने या जागेवरुन गिरिश पांडव यांना उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीकडून १९६ उमेदवार जाहीर
महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये ९०-९०-९० असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ८० तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसकडून ७१ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार महाविकास आघाडीने १९६ उमेदवार जाहीर केले आहेत.
२३ उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ
भुसावळ - राजेश मानवतकरजळगाव - स्वाती वाकेकरअकोट - महेश गणगणेवर्धा - शेखऱ शेंडेसावनेर - अनुजा केदारनागपूर दक्षिण - गिरिश पांडवकामठी - सुरेश भोयरभंडारा - पूजा ठवकरअर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोडआमगाव - राजकुमार पुरमराळेगाव - वसंत पुरकेयवतमाळ - अनिल मांगुलकरआर्णी - जितेंद्र मोघेउमरखेड - साहेबराव कांबळेजालना - कैलास गोरंट्यालऔरंगाबाद पूर्व - मधुकर देशमुखवसई - विजय पाटीलकांदिवली पूर्व - काळू बधेलियाचारकोप - यशवंत सिंगसायन कोळीवाडा - गणेश यादवश्रीरामपूर - हेमंत ओगलेनिलंगा - अभय कुमार साळुंखेशिरोळ - गणपतराव पाटील