लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. सर्वाधिक काळ देशाची सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला शेतकऱ्यांचा, कामगारांचा व गरिबांचा विसर पडल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केला.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह बोलत होते. या वेळी मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. शेतकऱ्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार संवेदनशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मीदेखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक पावलेही उचलली आहेत. त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभे राहिले पाहिजे. शेतकरी किंवा देशातील सर्वसामान्य, गरीबांच्या विश्वासाला तडा जाईल, असा कोणताही निर्णय आमचे सरकार घेणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देत असून यापुढेही देतच राहणार, असेही त्यांनी सांगितले.स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही सरकारने आर्थिक आघाडीवर चांगली स्थिती असताना आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविला नव्हता. हे धाडस मोदी सरकारने दाखविले. वस्तू व सेवा कराच्या निमित्ताने स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी आर्थिक सुधारणा मोदी सरकारने राबविली आहे. जीएसटीमुळे ‘कर दहशतवाद’ संपणार असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला.>शिवसेना आमचा मित्रपक्षशिवसेनेशी आमचे जुने नाते आहे. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. आता कुटुंबात एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतात, मात्र त्याचा अर्थ संबंध वाईट आहेत असा होत नाही. त्यांच्याशी आमचे संबंध चांगले असल्याचेही सिंह म्हणाले.
‘शेतकऱ्यांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार’
By admin | Published: June 09, 2017 5:37 AM