कमलेश वानखेडे
नागपूर - महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने उद्धवसेना व शरद पवार गटाकडे असलेल्या मतदारसंघांतही चाचपणी सुरू केली आहे. आजवर १७२ मतदारसंघांचा आढावा पूर्ण केला आहे. मराठवाड्यातील ४६, उत्तर महाराष्ट्रातील ४६, पश्चिम महाराष्ट्रातील ५०, अमरावती विभागातील ३० मतदारसंघांचा आढावा पूर्ण झाला. १९ सप्टेंबरला ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतील ४०, २२ व २३ सप्टेंबरला नागपूर विभागातील ३२, २४ व २७ सप्टेंबरला मुंबईतील ३६ जागांचा आढावा घेतला जाईल. काँग्रेसकडून विधानसभानिहाय सर्वेक्षण करून घेतले जात आहे.
पक्ष सोडला तर चर्चा
विद्यमान आमदार ज्यांचा असेल तो मतदारसंघ त्याच पक्षाला मिळेल. मात्र, संबंधित आमदार पक्ष सोडून इतर विरोधी पक्षात गेले असतील, तेथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असेल तर अशा जागांवर दावा करण्याचा व चर्चेतूनच निर्णय घेण्याचे धोरण काँग्रेसने निश्चित केले आहे.
मविआचे सरकार येणार
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम सुरु असून आतापर्यंत काँग्रेस पक्षाने १७२ मतदार संघाचा आढावा घेतला आहे. २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदार संघाचा आढावा पूर्ण होईल. राज्यातील वातावरण मविआसाठी अनुकुल आहे, परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता बनलेली असून भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून २/३ बहुमताने मविआचे सरकार येईल असा, विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.