मॅरेथॉन बैठकीत काँग्रेसने घेतला राजकीय आढावा; पक्षनेत्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:13 AM2018-11-18T01:13:46+5:302018-11-18T01:14:35+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात सलग तीन दिवस बैठका पार पडल्या.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात सलग तीन दिवस बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकांमध्ये इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी केलेली गर्दी पाहून पक्षनेत्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र दिसत होते. संपूर्ण ताकतीनिशी काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
खा. चव्हाण म्हणाले, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभागातील सर्व लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता, महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र आहे. जनतेच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाचा पराभव करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार येईल.