मुंबई : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी काँग्रेस पक्षाने आज संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला. राज्यात अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. सर्व प्रमुख नेत्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.संपूर्ण कर्जमुक्तीसाठी पुकारलेल्या दोन दिवसीय आंदोलनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ९ जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात तर नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोर्चाचे नेतृत्व केले. प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांनी भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. विखे पाटील यांनी कर्जमुक्तीसाठी राज्यभरात निघालेला मोर्चा भाजपा सरकारला इशारा असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी कर्जमुक्ती झाली नाही, तर सरकारला विधानसभेत जाब विचारू, असे सांगितले.राणे यांनी भाजपाचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले. आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे मोर्चा निघाला. ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे तर रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे वरिष्ठ नेते व माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण यांनी उस्मानाबाद येथे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी पालघर येथे मोर्चे काढले. १० जुलैला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे मार्चा काढला जाईल. (विशेष प्रतिनिधी)
कर्जमुक्तीसाठी काँग्रेस रस्त्यावर
By admin | Published: July 10, 2015 2:56 AM