Congress Sachin Sawant: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजेरी लावली आणि सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आक्षेप नोंदवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिल्याचे समजते. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक्सवर पोस्ट करत अजित पवार यांना सल्ला दिला आहे.
नवाब मलिक आपल्या पक्षात नाहीत किंवा महायुतीत नाहीत अशी स्पष्ट भूमिका जाहीर न करता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने याबाबत नरोवा कुंजरोवा भूमिका घेतली. नवाब मलिक सभागृहात कुठे बसले, ते तुम्ही पाहिले, त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका मांडेन, असे अजित पवारांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रानंतरही नवाब मलिक यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याने महायुतीतील तणाव चिघळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट शेअर करत भाष्य केले आहे.
अजितदादांनी नवाब मलिकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही
नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवण्याचे कारण त्यांनी दाऊद शी संबंधित मालमत्ता घेतली हा आरोप व तपास यंत्रणांकडून चौकशी - प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी संबंधित मालमत्ता घेतली - इडीने ती ताब्यात घेतली तरी भाजपाला चालते पण नवाब मलिक चालत नाहीत. इतकेच काय? RKW डेव्हलपर्स लिमिटेड आणि सनब्लिंक रिअल इस्टेट या कंपन्यांची ED द्वारे टेरर फंडिंग तसेच इक्बाल मिर्चीशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे. भाजपाने या कंपन्यांकडून ₹२० कोटी देणगी घेतली तेही चालते. आता भाजपा नेते भाजपा अध्यक्षांना पत्र कधी लिहिणार? असो! अजितदादांनी आपल्या सहकाऱ्याला भाजपाच्या दबावात वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का? यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी. उगीच उत्तर नाही म्हणून "एक मिनिट - एक मिनिट" करुन पत्रकारांना धमकावू नये, असे सचिन सावंत यांनी एक्सवर म्हटले आहे.
दरम्यान, नवाब मलिकांना कोटनि निदर्दोष ठरविलेले नाही. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही. महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे, असे याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.