राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. त्यामुळे कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची माहिती त्यांनी दिली. याच दरम्यान यावरून काँग्रेसने निशाणा साधला आहे.
"महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले" असं म्हटलं आहे.
"महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का?"
"आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपाची भावना दिसते. महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? जाहीर निषेध!" अस देखील सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारींची इच्छा
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे.
"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"