भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं. यानंतर आता चित्त्यांवरून राजकीय पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच काँग्रेसने ही आता चित्त्यांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "लंपीने मरत आहेत हजारो गोमाता, गोदी मीडीया, भक्त आणि भाजपा नेते मात्र बोलती... चित्ता ता चिता चिता चित्ता ता ता" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीनेही यावरूनच पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. "चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता" असं म्हणत घणाघात केला आहे.
"चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता"
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून जोरदार टीका केली आहे. चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलं. चित्त्यांना जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातं तसं द्यायला पाहिजे… पण त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचं असल्याचं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावरून निशाणा साधला आहे.
"चित्ते आले ठीक आहे पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?"
अजित पवार (Ajit Pawar) यांनी "बऱ्याचदा दुर्दैवाने, तुमच्या माझ्या देशात, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात... महागाईचे, बेरोजगारीचे, कायदाव्यवस्थेचे याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठीक आहे, चित्ते वाढावे हे ठीक आहे .. पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?, याऐवजी वेदांताचं काय होणार ते सांगा?" असा सवाल विचारला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.