कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस 136, जेडीएस 20 तर भाजपा 64 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 4 जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपाचा पराभव झाला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर बोचरी टीका केला आहे. "काँग्रेसचा विजय लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीच्या अंताची नांदी ठरेल" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "हा मोदींचा पराभव, राहुल गांधींच्या संघर्षाचा विजय" असं म्हटलं आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाचा अभूतपूर्व विजय हा राहुल गांधी यांच्या संघर्षाचा - भारत जोडो यात्रेमार्फत दिलेल्या प्रेमाच्या संदेशाचा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील टीमवर्कचा, स्थानिक नेत्यांच्या लढवय्येपणाचा व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आहे. काँग्रेसचा विजय लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीच्या अंताची नांदी ठरेल."
"कर्नाटकमध्ये भाजपाच्या लोकशाहीविरोधी, धार्मिक ध्रुवीकरणाच्या, यंत्रणांच्या वापरातून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा, द्वेष तिरस्कार पसरविण्याच्या गलिच्छ राजकारणाचा पराभव झाला आहे. हा मोदींचा पराभव आहे" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. काँग्रेसनं बहुमताचा जादुई आकडादेखील गाठला आहे. दुसरीकडे भाजपचा दक्षिणेचा बालेकिल्ला ढासळल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसंच त्यांनी कर्नाटकातील जनतेचे आणि तेथील कार्यकर्ते, नेत्यांचे आभारही मानले. “कर्नाटक निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीब जनतेची ताकद होती. जनतेच्या शक्तीनं ताकदीचा पराभव केला. हेच आता प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांसोबत उभी राहिली. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर लढलो. आम्ही द्वेषानं, चुकीच्या शब्दांचा वापर करून ही लढाई लढलो नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.