Sachin Sawant : "नकला आणि कलाविष्कारातील फरक समजण्यासाठी..."; काँग्रेसने ट्विट केला मोदींचा 'तो' Video
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:35 PM2022-10-14T15:35:36+5:302022-10-14T15:50:23+5:30
Congress Sachin Sawant Slams BJP : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गट या दोन गटांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. टीका करण्यात दोन्ही गटाचे नेते आघाडीवर असल्याचे कायमच दिसून आले आहेत. प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप शिंदे गटाने ठाकरे गटातील नेतेमंडळींवर केला आहे. त्यामुळेच, राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटातील विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावरून काँग्रेसने आता भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच "भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाचे नीट अध्ययन केले असते तर शिवसेनेच्या भास्कर जाधव व इतर नेत्यांवर नकला केल्या म्हणून गुन्हे दाखल झाले नसते. नकला आणि कलाविष्कार यातील फरक समजण्यासाठी मोदीजींचा कलाविष्कार पाहणे गरजेचे आहे" असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाच्या शिर्ष नेतृत्वाचे नीट अध्ययन केले असते तर @ShivSena च्या @_BhaskarJadhav व इतर नेत्यांवर नकला केल्या म्हणून गुन्हे दाखल झाले नसते.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 14, 2022
नकला आणि कलाविष्कार यातील फरक समजण्यासाठी मोदीजींचा कलाविष्कार पाहणे गरजेचे आहे. pic.twitter.com/U86MquIgUg
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींच्या भाषणातील दोन व्हिडीओ क्लिप एकत्र केल्या आहेत. या दोन्ही व्हिडीओ क्लिपमध्ये मोदी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नक्कल करताना दिसत आहेत. पहिल्या क्लिपमध्ये मोदींनी राहुल गांधींची हाताच्या बाह्या वर सरकवण्याची नक्कल केली आहे. तर दुसऱ्या क्लिपमध्ये मोदी संसदेत भाषणादरम्यान राहुल गांधींची डोळा मारण्याची नक्कल करताना दिसत आहेत.