मुंबई - भाजपाने राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत. तर काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन सुरू आहे. यात चंद्रकांत पाटील यांनी नियम मोडून आजच मंदिरात शिरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. याच दरम्यान काँग्रेसने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
"केंद्र सरकारने स्वत: उत्सवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपा नेते मोदींविरुद्ध आंदोलन करणार का?" असा सवाल देखील काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी भाजपावर (BJP) हल्लाबोल केला आहे. शंखनाद आंदोलनाची खिल्ली उडवताना त्यांनी भाजपाला शंखासुराची उपमा दिली आहे. "शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही" असं सावंत यांनी म्हटलं आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स करत भाजपावर जोरदार टीका केली आहे. "भाजपा सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का? दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे" असं ट्विट केलं आहे. तसेच "रुग्ण वाढले तर मोदी टिका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी बघ्याची भूमिका घेऊ नये" असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
भाजपचे काही कार्यकर्ते कसबा गणेश मंदिरात शिरल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं लादलेल्या नियमांचं भंग केला म्हणून आवश्यक त्या कारवाईला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत. पण हिंदूंच्या भावना आता सरकारला दुखावू देणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का? आज काहीही झालं तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.