Video - "ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी... सर आली धावून, भाजपा ऑफिस गेले वाहून"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:10 PM2022-09-13T15:10:53+5:302022-09-13T15:11:26+5:30
Congress Sachin Sawant Slams BJP : काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
गणपती विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधारा सुरूच असल्याने परिसरातील धरणांतील पाणी पातळी जलद गतीने वाढली आहे. यातच पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला व पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात सतत वाढ होत आहे. याच दरम्यान काँग्रेसने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
"ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी... सर आली धावून, भाजपा ऑफिस गेले वाहून" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "येरे येरे पावसा, पुणे पालिकेचा खाल्ला पैसा... पैसा मिळाला मोठा, भाजपा ठरला खोटा... ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी... सर आली धावून, भाजपा ऑफिस गेले वाहून!" असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच पावसाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
येरे येरे पावसा,
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 13, 2022
पुणे पालिकेचा खाल्ला पैसा
पैसा मिळाला मोठा, #भाजपा ठरला खोटा
ये गं ये गं सरी, #भाजपा खिसे भरी
सर आली धावून,
भाजप ऑफिस गेले वाहून!
😂😂😂 pic.twitter.com/WiqVcdaIFB
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १ हजार ९२९ क्युसेक्स विसर्ग वाढवून ३ हजार ४२४ क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी किंवा पर्यटकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.