Sachin Sawant : "खोक्यामधी खोका भाजपचा चांगला, देखा सत्तेसाठी खोका वेशीले टांगला"; काँग्रेसचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:59 AM2022-09-26T11:59:54+5:302022-09-26T12:07:11+5:30
Congress Sachin Sawant Slams BJP : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते. परभणी शहरातील कार्यक्रम आटपून ते पूर्णा शहराकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर पूर्णेत शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा थांबविला. त्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, कामगारांच्या हाताला कामे द्यावीत, लम्पी आजाराने बाधित जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत करावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन कृषीमंत्र्यांकडे सुपूर्द केले. कृषीमंत्री सत्तार गाडीच्या दिशेने निघताच उपस्थित शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकमद ओकेच्या घोषणा दिल्या. अचानक घोषणाबाजी सुरू झाल्याने कृषीमंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला. यानंतर आता काँग्रेसनेभाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"खोक्यामधी खोका भाजपचा चांगला, देखा सत्तेसाठी तिन खोका वेशीले टांगला" असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अरे खोक्यामधी खोका भाजपचा चांगला, देखा सत्तेसाठी तिन खोका वेशीले टांगला! आमदार निजती निवांत वाचे पैसा नं बंगला, ईडीने कासावीस जीव जीव भांड्यात पडला!" असं सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच खोके_सरकार आणि 50खोकेएकदमओके हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
"लंपीने मरत आहेत हजारो गोमाता, भाजपा नेते बोलती... चित्ता ता चिता चिता चित्ता ता ता"
चित्त्यांवरून राजकीय पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच काँग्रेसने ही चित्त्यांवरून जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. सचिन सावंत यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर टोला लगावला होता. याबाबत एक ट्विट केलं होतं. "लंपीने मरत आहेत हजारो गोमाता, गोदी मीडीया, भक्त आणि भाजपा नेते मात्र बोलती... चित्ता ता चिता चिता चित्ता ता ता" असं सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादीनेही यावरूनच पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला होता. "चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता" असं म्हणत घणाघात केला होता.
"चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता"
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून जोरदार टीका केली होती. चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. चित्त्यांना जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातं तसं द्यायला पाहिजे… पण त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचं असल्याचं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. अजित पवार (Ajit Pawar) यांनीही "बऱ्याचदा दुर्दैवाने, तुमच्या माझ्या देशात, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात... महागाईचे, बेरोजगारीचे, कायदाव्यवस्थेचे याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठीक आहे, चित्ते वाढावे हे ठीक आहे .. पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?, याऐवजी वेदांताचं काय होणार ते सांगा?" असा सवाल विचारला होता.