Sachin Sawant : "'हॅलो' इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार?"; काँग्रेसचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 03:58 PM2022-08-16T15:58:13+5:302022-08-16T16:06:16+5:30
Congress Sachin Sawant Slams BJP Sudhir Mungantiwar : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता काँग्रेसनेही यावरून खोचक टोला लगावला आहे.
"'हॅलो' इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार?" असं काँग्रेसने म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "सरकारने अक्कल गहाण ठेवली असे आम्ही म्हणणार नाही. कारण सरकार व अक्कल शब्द ही फारसी आहेत" असंही म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "'हॅलो' इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार? पलंगावर कसे झोपणार? खुर्ची, पलंग फारसी शब्द आहेत. बटाटा, कोबी, हापूस, पपई, पेरू, अननस, बिस्कीट खाऊ नका, पोर्तुगीज आहेत ते. सरकारने अक्कल गहाण ठेवली असे आम्ही म्हणणार नाही. कारण सरकार व अक्कल शब्द ही फारसी आहेत" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
'हॅलो' इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार? पलंगावर कसे झोपणार? खुर्ची, पलंग फारसी शब्द आहेत. बटाटा, कोबी, हापूस, पपई, पेरू, अननस, बिस्कीट खाऊ नका, पोर्तुगीज आहेत ते. सरकारने अक्कल गहाण ठेवली असे आम्ही म्हणणार नाही. कारण सरकार व अक्कल शब्द ही फारसी आहेत😂
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 16, 2022
‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वाद
मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्याबरोबर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणला आहे. मी फोन उचलल्याबरोबर ‘हॅलो’ म्हणतो. हा देश जेव्हा गुलामगिरीत होता, तेव्हा त्यांनी हा शब्द दिलेला होता. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम् म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचे स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रूपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले होते. वंदे मातरम् शिवाय दुसरा सर्वांना मान्य असेल, असा पर्याय द्या, अशा शब्दांत रझा अकादमीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाला आक्षेप घेतला आहे. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी सल्लामसलत करणार असल्याचे म्हटले आहे.
‘वंदे मातरम् नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात, मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही. काही जण ‘जय हिंद’ बोलतात, काही ‘जय महाराष्ट्र’ बोलतात. आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात. शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात. आता शिंदेंनी मुनगंटीवारांना विचारावे, की फोन केल्यावर काय म्हणायचे?, असे भुजबळ म्हणाले.