मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ९ हजार २३५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय विकासकामांसह सिंचना योजनांच्या कालबध्द कार्यक्रमाची घोषणा केली. सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाला अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी मुख्य ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात विभागातील जनतेला मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे स्मरण केले. यानंतर त्यांनी विभागाच्या विकासासाठी महत्त्वकांक्षी योजनांच्या घोषणा केल्या. यानंतर आता काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“नेत्याचे लांगुलचालन अन् स्वातंत्र्यसैनिकांचा विसर!” असं म्हणत निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “नेत्याचे लांगुलचालन अन् स्वातंत्र्यसैनिकांचा विसर! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवाड्याची पूर्ण पान जाहिरात देते. पण मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाची शासकीय जाहिरात कुठेही दिसून येत नाही. अगदी मराठवाड्यातही नाही. निषेध...” असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत"
काँग्रेसने याआधी वेदांता-फॉक्सकॉनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले असं ही म्हटलं आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करून मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातच्या ढोलेराला नेण्याने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत. आजवर ढोलेरामधून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे."
"वेदांता कंपनीने तळेगाव व ढोलेरा या दोन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार ढोलेरा येथे पाण्याची व कुशल कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टिम नसणे, दुय्यम उत्पादकांची कमतरता व दलदलयुक्त जमीन अशी अनेक कारणे देऊन नापसंती व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील तळेगाव हेच या प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होती. या करिता महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक भांडवली अनुदानासहित अनेक सवलती देऊनही आयत्या वेळी सदर प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झाला आहे" असं म्हटलं आहे.