मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली. आमदारांना घेऊन ते सूरतला गेले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी कारभार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेरीस शिवसेनेचे सुमारे ५० आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आला आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली आहे. "खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..." अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाला टोला लगावला.
काँग्रेसने देखील 'ओके' साबणाची एक जुनी जाहिरात शेअर करत शिंदे गटाला डिवचलं आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच ओके साबणाची जाहिरात शेअर करून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. "जो ( ५० खोके के) 'ओके' साबून से नहाएं... कमल सा खिल जाए । ED से भी बच जाए" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी पन्नास खोके या घोषणेला उत्तर दिलं आहे. ५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल असं केसरकर यांनी म्हटलं आहे. "सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात, घोषणा देतात. तो मुद्दा मी विधान परिषदेत खोडून काढला. ५० खोकेचा अर्थ ५० कोटी असा असतो. त्यांना मी सांगितलं साधे ५० रुपये जरी मी घेतलेले दाखवलेत तरी माझ्या पदाचा राजीनामा देईन."
५० खोकेच काय साधे ५० रुपये जरी घेतले असतील तरी राजीनामा देईन - दीपक केसरकर
"आम्ही मनापासून काम करणारे कार्यकर्ते असतो. म्हणून मी आव्हान केलं की ५० किंवा ५० हजार घेतलेलं सिद्ध करून दाखवा मी राजीनामा देतो. मी ५० आमदारांचं नेतृत्व करतो. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो. आम्ही प्रामाणिक आहोत म्हणूनच उघडपणे हे सर्व बोलू शकतो" असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.