Sachin Sawant : "मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत"; काँग्रेसची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:37 AM2022-09-15T11:37:20+5:302022-09-15T11:43:02+5:30
Congress Sachin Sawant Slams Narendra Modi : काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजीगुजरातल्या नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. परंतु आता यावर वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. याच दरम्यान काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे.
"मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले असं ही म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातच्या ढोलेराला नेण्याने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत. आजवर ढोलेरामधून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे."
६/७ गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले. ढोलेरा हा त्यातीलच एक प्रकल्प आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 15, 2022
असाच गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले.
"निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली"
"वेदांता कंपनीने तळेगाव व ढोलेरा या दोन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार ढोलेरा येथे पाण्याची व कुशल कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टिम नसणे, दुय्यम उत्पादकांची कमतरता व दलदलयुक्त जमीन अशी अनेक कारणे देऊन नापसंती व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील तळेगाव हेच या प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होती. या करिता महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक भांडवली अनुदानासहित अनेक सवलती देऊनही आयत्या वेळी सदर प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झाला आहे" असं म्हटलं आहे.
सचिन सावंत यांनी "बिलियन डॉलर गुंतवणूकीच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी देशात वेदांता फॉक्सकॉन सहित तीन कंपन्यांनी अर्ज केला. त्यातील ISMC Digital ही कंपनी ढोलेराला येणार होती.या कंपनीबरोबर गुजरात सरकारचा सामंजस्य करारही झाला होता. आता कंपनीने सुविधा व पाण्याच्या कमतरतेमुळे पळ काढला आहे. जिओफोन ही ढोलेरा सोडून तिरुपतीला गेला. या अगोदर लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या कंपनीने सोलार बॅटरी प्रकल्पातून ढोलेरामधून माघार घेतली. HCC ही सोडून गेली आहे. केंद्र सरकारच्या अट्टाहासाने वेदांन्ता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता आहे."
"मोदींनी गुजरात राज्यात अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले"
"गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले. ढोलेरा हा त्यातीलच एक प्रकल्प आहे.असाच गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले. गॅसचे साठे मिळाले असे दाखवून GSPCला ₹१०००० कोटीचे रोखे घेण्यास भाग पाडले गेले. पुढे साठा काय तर गॅसच नाही हे स्पष्ट झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या या कंपनीला केंद्रात सत्ता आल्यानंतर ओएनजीसीला विकत घेण्यास भाग पाडले गेले" असं म्हणत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.