मुंबई - ड्रग्ज प्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून एनसीबीच्या (NCB) कोठडीत असलेल्या आर्यन खानला (Aryan Khan) अखेर गुरुवारी (28 ऑक्टोबर) जामीन मिळाला. त्याच्यासोबत ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर युक्तिवाद सुरू होता. अखेर त्याला जामीन मिळाला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी वर्षभरापूर्वीचा एक व्हिडीओ शेअर करून NCB वर जोरदार निशाणा साधला आहे. आपण हे वर्षभरापूर्वीच सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सावंत यांनी त्यांचाच एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
सचिन सावंत यांनी 24 सप्टेंबर 2020 रोजी आपला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करत त्यांनी "मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झाली आहे. झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर ते आता स्पष्टच झालं आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सावंत यांनी वर्षभरापूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ते एनसीबीवर आरोप करताना दिसत आहेत. "बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन, चंदन तस्करी आणि गोवा कनेक्शनमधील भाजपाच्या सहभागाची चौकशी जाणूनबुजून केली जात नाही, त्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय?" असं म्हटलं होतं.
"भाजपा कार्यकर्त्याकडे गांजा सापडला पण एनसीबीकडे तिथे जाण्यासाठी वेळ नाही"
"एनसीबी 59 ग्रॅम गांजाच्या जप्तीमधून मोठा वाद उभा करते आहे. पण कर्नाटकमध्ये चंद्रकांत चौहान नावाच्या भाजपा कार्यकर्त्याकडे 1200 किलो गांजा सापडला. पण एनसीबीकडे तिथे जाण्यासाठी वेळ नाही. कर्नाटक सँडलवूड ड्रग्ज रॅकेटमधल्या मुख्य आरोपी रागिनी द्विवेदी भाजपाच्या स्टार प्रचारक होत्या. 12 लोकांवर आरोप ठेवण्यात आले. त्यापैकी आदित्य अलवा हा विवेक ओबेरॉयचा मेहुणा आहे. विवेक ओबेरॉय भाजपाचा गुजरातमधला स्टार प्रचारक आहे. मोदींच्या बायोपिकचा तो सहनिर्माता आहे. तो संदीप सिंगचा पार्टनर आहे. त्यांची एकमेव कंपनी आहे जिला गुजरात सरकारने बोलावलं आणि त्यांच्यासोबत 177 कोटींचा एमओयू केला. देवेंद्र फडणवीस सीएम असताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण कसं केलं?" असं सावंत यांनी म्हटलं होतं.
"कंगनाच्या व्हिडीओ मेसेजेसची चौकशी का करण्यात आली नाही?"
सचिन सावंत यांनी "राज्य सरकारकडून सीबीआयला विनंती करण्यात आली होती की कर्नाटकमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करावी. पण त्याची काहीही चौकशी करण्यात आलेली नाही" असा आरोपही व्हिडीओमध्ये केला होता. तसेच "व्हॉट्सएप चॅट जेव्हा चौकशीसाठी आधार मानले जातात, तर मग कंगनाच्या व्हिडीओ मेसेजेसची चौकशी का करण्यात आली नाही? ती देखील बॉलिवुडमधून आहे. मग तिला चौकशीसाठी का बोलावण्यात आलं नाही? या प्रश्नांची उत्तरं एनसीबीला द्यावी लागतील" असं देखील सावंत यांनी म्हटलं होतं.