Sachin Sawant : "दुर्योधन आणि दु:शासनाने केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सरकार अस्तित्वात"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 01:56 PM2022-07-05T13:56:25+5:302022-07-05T14:05:09+5:30
Congress Sachin Sawant Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. मात्र, राजभवनावर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिंदे यांच्या गटाला भाजपा पाठिंबा देईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले.
राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडल्या. अखेरीस राजभवनावरील छोटेखानी समारंभात शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता काँग्रेसने नव्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुर्योधन आणि दु:शासन असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले" असं देखील म्हटलं आहे.
'दुर्योधन' म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व 'दु:शासन' म्हणजेच मोदी सरकारच्या अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 5, 2022
काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "'दुर्योधन' म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व 'दु:शासन' म्हणजेच मोदी सरकारच्या अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा" असं म्हणत सचिन सावंत यांनी सत्ताधाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजपा सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेत भाजपचे राहुल नार्वेकर जिंकले. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे. दरम्यान, विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली.