राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी वादात सापडले आहे. चप्पल घालून शहिदांना अभिवादन केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी आज 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोश्यारी यांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ ट्विट केला. तसेच "महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते" असं म्हटलं आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते" असं सावंत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?
'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"