“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 02:38 PM2024-10-14T14:38:07+5:302024-10-14T14:41:14+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Politics: शरद पवार गटातील नेते, पदाधिकारी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत असतानाच आता काँग्रेस आमदारांनीही हीच भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Politics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कधी लागणार, निवडणुका कधी होणार आणि मतमोजणी कधी असेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. सर्वच पक्षांनी तयारीवर मोठा भर दिला असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच भाजपामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला आता काँग्रेस आमदाराने विरोध केल्याची माहिती देण्यात आली आहे.
इंदापूर येथील मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा जवळपास निश्चित झाल्यावर नाराज झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली आणि काहीच दिवसांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु, हर्षवर्धन पाटील यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे इंदापूर येथील शरद पवार गटाचे नेते, पदाधिकारी नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. शरद पवार गटातून हर्षवर्धन पाटील यांना विरोध होत असतानाच आता काँग्रेसमधूनही विरोध होताना दिसत आहे.
हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका
हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर शरद पवार गटातील नाराज नेते आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने, भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. आता आमदार संजय जगताप यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेस भवनावरून विरोध दर्शवला आहे. तसेच इंदापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. हाच धागा पकडत संजय जगताप यांनीही विरोध केला आहे. इंदापूर पक्ष कार्यालय पुन्हा एकदा काँग्रेसला मिळत नाही. तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
दरम्यान, इंदापूर काँग्रेस भवनचा ताबा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असणारी इंदापूर काँग्रेसची इमारत जोपर्यंत ते पक्षाला परत करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचे काम करणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसची इमारत परत करा मगच आम्ही त्यांचे काम करू, असा निर्धार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.