Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात करत असून, शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिंदे-फडणवीसवर टीका केली आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आले. पण फायदा गुजरातला झाला, असा टोला चव्हाण यांनी लगावला.
केवळ राज्य सरकारच नाही, तर केंद्रावरुन हलचाली झाल्यानेच हा महत्वाचा प्रकल्प गुजरातला हलवला गेल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी काही प्रश्न उपस्थित केले. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच केंद्रातून चक्रे फिरली आणि महाराष्ट्रातला प्रकल्प थेट गुजरातला गेल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप केल्यानेच हा प्रकल्प गुजरातला गेला
याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वीज, पाणी हे कमी दराने देत ३४ हजार कोटींची सवलत देण्याचे ठरवले होते. एवढेच नाहीतर केंद्रानेही सवलती देण्याचे ठरवले होते. या प्रकल्पात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केल्यानेच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. शिवाय या प्रकल्पाच्या स्पर्धेत गुजरात राज्य नव्हते. त्यामुळे अधिक रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हट्टापायी बुलेट ट्रेनचा प्रकल्प झाला आहे. मुंबई येथे बुलेट ट्रेनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारणे गरजेचे होते. पण याकडेही दुर्लक्ष करीत बुलेट ट्रेन गुजरातलाच नेण्यात आल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.