Maharashtra Politics: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धूळ चारल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत नवउत्साह संचारला आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले.
तुमची ताकद जास्त असेल तरच तुम्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिले जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र, त्याआधीच अजित पवारांनी केलेले विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
सद्यस्थिती पाहता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विधान करण्यात चुकीचे काही नाही. परंतु, अशा वक्तव्यांना फारसे महत्त्व नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात, असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. दुसरीकडे, आम्ही मोठे होतो तेव्हा कधीच गर्व केला नाही त्यांनीही गर्व करू नये. आम्ही नेहमी मोठे होतो मात्र आम्ही कधीही त्याचा गर्व केला नाही. सर्वांना सोबत घेऊन चाललो, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती.