NDA Vs INDIA: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी पक्षांनी आपल्या नव्या आघाडीला INDIA असे नाव दिले आहे. विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA नेही कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INDIA वर जोरदार टीका केली असून, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे.
विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते. केवळ ‘इंडिया’ नाव ठेवल्यानं होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही ‘इंडिया’ लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘इंडिया’ आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यातच मणिपूर हिंसाचार आणि या टीकेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
INDIA असल्याचा अभिमान, हिंमत असेल तर मणिपूरवर बोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी नावावरुन चर्चा करणे हास्यास्पद आहे. आता लढाई विचारांची आहे. विचारांची लढाई आहे तर विचारांवर बोला. मात्र त्यावर बोलायची तुमची हिंमत नाही. शिवाय मणिपूरच्या घटनेवर बोलायची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिंमत नाही. आम्ही इंडिया आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान मोदींनी इंडिया नावावरून कुरापत केली तरी त्याचा उपयोग होणार नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दरम्यान, पंतप्रधानांनी अशी टीका करणे योग्य नाही. पंतप्रधानपद हे मोठे पद आहे. पंतप्रधान देशाचे प्रमुख असतात. असे असताना विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया संघटना स्थापन केली. त्यावर अशा प्रकारे शेरेबाजी करणे योग्य नाही, असा पलटवार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता.