काँग्रेस, शरद पवार यांनी राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करावी: अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 08:18 PM2019-02-09T20:18:55+5:302019-02-09T20:19:11+5:30
केवळ राम मंदिर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे भाजपाने शांतता बाळगली आहे.
पुणे: अयोध्येतील राम मंदिर बांधण्यासाठी भाजपा कटिबद्ध, वचनबद्ध आहे. केवळ हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे भाजपाने शांतता बाळगली आहे. मात्र, शरद पवार व काँग्रेस यांनी राम मंदिराबाबत आपआपली भूमिका स्पष्ट करावी.असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले.
पुणे, बारामती व शिरूर या लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुखांचे संमेलन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश कला क्रिडा मंदीर येथे शनिवारी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे,, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप, संघटन मंत्री विजय पुराणिक यावेळी उपस्थित होते. यावेळी शहा बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येत आहे त्याच ठिकाणी राम मंदिर होणार यात शंका नाही. ममतांची सभा कोल्हापूरात लावली, देवगौडांची सभा पुण्यात घेतली. अखिलेशला धुळ्यात बोलावले तर कोणी त्यांना ऐकण्यासाठी येतील का? त्यांची चिंता करू नका, ते फक्त आपापल्या राज्यातच मोठे आहेत. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, नेत्यांची नाही. कार्यकर्ता हीच आपली ओळख आहे. ममतांचा पश्चिम बंगाल तसेच ओरिसा येथेही भाजपाच जिंकणार आहे.
शहा म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा भ्रष्टाचार राज्याने पाहिला आहे. सार्वजनिक जीवनात कसे बोलावे याचाही विसर त्यांना सत्तेमुळे पडला होता. अजित पवार काय बोलले होते याची आठवण अजूनही राज्याला असेल. ७० हजार करोड रुपये खर्च करूनही त्यांना शेतीला पाणी देता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यापेक्षा कमी खर्चात व कमी वेळेत जलयुक्त शिवारचे कितीतरी चांगले काम केले.