Maharashtra Vidhan Sabha Elections 2024, Congress Planning: राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळावून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली असून या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला शुक्रवारी (१९ जुलै) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते मुंबईत बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत तसेच काँग्रेस नेते, पदाधिकारी, खासदार आमदारांना मार्गदर्शन करून रणनीती ठरवणार आहेत.
राज्यातील कोणकोणत्या नेत्यांचा बैठकीत असेल समावेश?
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता गरवारे क्लब येथे होणाऱ्या या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते आ. सतेज (बंटी) पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा, मार्गदर्शन
दुपारी २ वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जाणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मतदार याद्या पुनरिक्षणाचा आढावा तसेच संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे, व रणनीती ठरवली जाणार आहे. या बैठकीला के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.