मुंबई - राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नाईलाजाने काम करावं लागले असं विधान एका मुलाखतीत केले. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या विधानाचा समाचार घेतला आहे. नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथच घ्यायला नको होती. पदावर बसून खदखद व्यक्त करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती असं नाना पटोलेंनीअजित पवारांना सुनावले आहे.
नाना पटोले म्हणाले की, २००४ साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार होते. त्यांचा नाईलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली? मंत्रीपदाची शपथ घ्यायला नको होती. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अजित पवारांनी असे बोलावं ही अपेक्षा नाही. खदखद वाटत होती तर त्यावेळीच सोडून जायला हवे होते असं त्यांनी अजित पवारांना सुनावले.
तसेच राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही, अजित पवार यांच्याकडे १४५ चा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे. मी बनतो असं म्हणण्याचं कारण नाही. अजित पवारांचे व्यक्तिगत काय असेल त्यावर काही बोलणार नाही. राज्यात आज अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खारघर दुर्घटनेमुळे राज्याला काळिमा लागला आहे. बेरोजगारांचे प्रश्न आहेत. महागाई वाढली आहे या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. परंतु राजकीय चर्चा, स्फोट होणार वैगेरे बोलले जाते. मग लोकशाहीचा स्फोट झाला तर कोण वाचवणार आहे? या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं असंही नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, २ दिवसांपूर्वी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तिसऱ्यादिवशी पुन्हा ते पक्ष सोडणार अशी चर्चा झाली. माध्यमांना काय माहिती, किती माहिती, काय सांगावे हा माध्यमांचा अधिकार आहे. सध्या कोण कोणाला भेटते, व्यक्तिगत भेटते या सर्व बाबींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत असा सूचक इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.