जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 07:05 PM2024-08-10T19:05:33+5:302024-08-10T19:06:51+5:30

लातूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी महायुतीला फटकारलं. 

Congress state president Nana Patole criticizes BJP along with CM Eknath Shinde | जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

लातूर - महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा आरएसएसचं नियंत्रण आहे. एकनाथ शिंदे हा फक्त मुखवटा आहे. २ समाजात भांडण लावायचे. फूट पाडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची रणनीती तीच भाजपाची आहे. जरांगे आमचाच कार्यकर्ता असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सांगितल्याचा गौप्यस्फोट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर निशाणा साधला. 

मराठवाडा विभागातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा लातूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नाना पटोले म्हणाले की, मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई, ओबीसी, धनगरांच्या आरक्षणाची लढाई असेल. मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभा होतो. एकनाथ शिंदे आमच्याकडे आले. महाराष्ट्रात जे काही चाललंय ते बरोबर चाललं नाही असं मी त्यांना सांगितले. त्यावेळी तो आमचाच कार्यकर्ता आहे, जरांगेंना मुख्यमंत्री त्यांचा कार्यकर्ताच सांगत होते. त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. ज्या काही भावना घेऊन जरांगे पाटील लढतायेत. मराठा समाज त्यांच्या पाठिशी आहेत हे पाहतोय. एकट्या जरांगे पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करायचा नाही तर संपूर्ण समाजाचा करेक्ट कार्यक्रम करायचा असा त्याचा अर्थ होतो असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय सरकारच्या मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री ओबीसींकडे जातात, अर्धे मंत्री मराठा समाजाकडे जातात. मग विरोधी पक्ष काहीच बोलत नाही असं बोलतात. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्हाला काहीही अडचण नाही. कुणाच्या तोंडचा घास हिसकावून देऊ नका एवढीच आमची भूमिका आहे हे आम्ही बैठकीत सांगितले. सरकारनेही तीच भूमिका ठेवली. तुम्हीच गुलाल उडवला, काय झालं, कशासाठी गुलाल उडवला हे विरोधी पक्षाला सांगितले नाही. महाराष्ट्र विकायचा गुजरातधार्जिणा करायचा हे सगळी पापे सुरू आहेत. २०१४ मध्ये आम्ही आरक्षण देतो असं तुम्हीच आश्वासन दिले, राज्यात, देशात तुमचं सरकार आहे मग आरक्षण देण्यापासून तुम्हाला थांबवले कुणी, मुद्दामून नौटंकी करायची. २ समाजात भांडण ठेवायचं. फूट पाडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची रणनीती होती तीच भाजपाची आहे. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. हे सरकार चुकून सत्तेत आलेत त्यांना परतीचा प्रवास दाखवावा लागेल असा इशाराही नाना पटोले यांनी सरकारला दिला. 

दरम्यान, हे सरकार २७० कोटी रुपये जाहिरातीत खर्च करतायेत. काँग्रेस सरकार राज्यात आल्यास महालक्ष्मी योजना आणू आणि लाडकी बहीण योजनेपेक्षा जास्त पैसे देऊ. मध्य प्रदेशात या लोकांनी योजना आणली आणि निवडणूक झाल्यावर बंद करून टाकली. आम्हाला नकली करायचं नाही. महागाई कशी कमी करता येईल त्याचे नियोजन आम्ही करू. वर्षाला ३ सिलेंडर मोफत देऊ असं हे सरकार बोलतं, पण कर्नाटकात आमचं सरकार ५०० रुपयांना सिलेंडर देतंय. २०१४ पासून २०२४ पर्यंत मोदींनी इतक्या घोषणा केल्या, त्या घोषणा तुम्हालाही आठवत नाही आणि आम्हालाही आठवत नाही. १५ लाख खात्यात टाकू, २ कोटी वर्षाला रोजगार देऊ असं बोलले होते. फडणवीस सांगतात, लोकांची स्मरणशक्ती कमी आहे असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर घणाघात केला. 
 

Web Title: Congress state president Nana Patole criticizes BJP along with CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.