काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 12:34 PM2024-07-06T12:34:33+5:302024-07-06T12:35:37+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच महिने शिल्लक आहेत त्यामुळे सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

Congress strategy or politics of pressure?; The tension of Uddhav Thackeray and Sharad Pawar will increase | काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळेच काँग्रेसनं राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. परंतु काँग्रेसची ही रणनीती आहे की महाविकास आघाडीत दबावतंत्राचं राजकारण असा प्रश्न निर्माण होत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात सर्वाधिक १३ जागा जिंकल्या तर १ अपक्ष ज्यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली तेदेखील निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे काँग्रेसकडे एकूण १४ खासदारांचे बळ आहे. अशात विधानसभा निवडणुकीत मविआकडून जास्तीत जास्त लढवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. मात्र तत्पूर्वी काँग्रेस २८८ मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवून पक्ष संघटनेची रणनीती आखत असल्याचं दिसून येते. 

काँग्रेसकडून इच्छुकांना पत्र गेले आहे. या पत्रात म्हटलंय की, राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे असं मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना कळवण्यात आलं आहे.

पत्रात काय म्हटलंय?

इच्छुक उमेदवारांचा अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात १० ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावेत

विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी २० हजार आणि अनु जाती, जमाती, महिला उमेदवारांसाठी १० हजार रुपये पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नावे डी.डीद्वारे किंवा जिल्हा कमिटीकडे जमा करावेत.

जे उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा होतील ते उमेदवारी अर्ज पक्षनिधीसह प्रदेश कार्यालयात उपरोक्त दिनांकापूर्वी सादर करावेत. आपापल्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहचवावी अशा सूचना प्रदेश काँग्रेसनं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

मविआतून लढण्यासाठी वरिष्ठ नेते आग्रही

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतूनच लढावी अशी सूचना काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील नेत्यांना दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात दमदार यश मिळालं. राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर मविआ विजयी झाली, त्यात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, त्यानंतर उद्धवसेनेनं २१ जागा लढवून ९ जागांवर विजय मिळवला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं १० जागा जिंकून ८ जागांवर विजय मिळवला. 

लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे-पवार यांच्यात विधानसभेच्या जागांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी अधिक मतदारसंघ घेण्यास तिन्हीही पक्ष इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत कुठेही वादंग होऊन स्वबळावर लढण्याची स्थिती आलीच तर पक्ष संघटना तयार राहावी यासाठी मविआतील तिन्ही पक्ष आपापल्या परीने पक्षाची ताकद वाढवण्यावर जोर देत आहेत. 

Web Title: Congress strategy or politics of pressure?; The tension of Uddhav Thackeray and Sharad Pawar will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.