"सांगलीतील १० टक्के ग्रामपंचायतही ठाकरेंकडे नाही; टोकाची भूमिका घ्यावी लागली तर.."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 02:22 PM2024-03-18T14:22:49+5:302024-03-18T14:23:47+5:30
कार्यकर्त्यांची भावना जोपासण्याकरिता सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील ही वरिष्ठांनीही मान्य केले असं विश्वजित कदम यांनी सांगितले.
मुंबई - Vishwajeet Kadam on Sangali ( Marathi News ) सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यासाठी ठाकरेंनी हट्ट करू नये. सांगलीत आज ६०० गावे आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वानं सांगावे, यातील १० टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का?. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही. टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ परंतु ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे हे आमचे ठाम मत आहेत असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे.
विश्वजित कदम यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आज बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीनंतर विश्वजित कदम म्हणाले की, कुठल्या जागेबदली कोणती जागा द्यावी हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु राजकारण, समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागते आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत. चंद्रहार पाटील यांनी ६-७ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाची मागणी चुकीची आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सांगलीच्या भूमीने काँग्रेस पक्षाच्या विचाराचे नेते देशाला दिले. काँग्रेस पक्षाकडेच सांगली राहिली पाहिजे ही लोकांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. महाविकास आघाडी एकत्रित आली त्याचा आनंद आहे. परंतु सांगलीच्या जागेवर कुठल्याही घटकपक्षाने दावा करण्याचा अधिकार नाहीत. आम्ही एकदिलाने, एक विचाराने काँग्रेस पक्षाकडे सांगलीची जागा राहावी यासाठी ठाम आहोत. काँग्रेसचे आज जिल्हा परिषद, पंचायत समिती अनेक स्तरावर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे असं विश्वजित कदम यांनी म्हटलं.
दरम्यान, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीबाबत ते व्यक्तिगत भूमिका सांगू शकत नाही. महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात अधिकृतपणे भाष्य झाले पाहिजे. सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे. ही जागा लढण्यास आणि जिंकण्यात काँग्रेस सक्षम आहे. सांगली मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, ठाकरे गटाला तो सोडू नये यासाठी स्थानिक आमदारांसह पदाधिकारी आग्रही आहे. त्यासाठी माझ्यासह विशाल पाटील आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे. कार्यकर्त्यांची भावना जोपासण्याकरिता सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील ही वरिष्ठांनीही मान्य केले असं विश्वजित कदम यांनी सांगितले.