मुंबई - विधान परिषदेच्या चार जागांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिेंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन होऊन याचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना काँग्रेस पक्षाने जाहीर पाठींबा दिला आहे. कोकण विभाग विधान परिषद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला, मुंबई शिक्षक विधान परिषद मतदार संघात लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव गट) चे उमेदवार कपील पाटील, मुंबई पदवीधर विधान परिषद मतदार संघात शेकापचे उमेदवार अॅड.राजेंद्र कोर्डे व नाशिक विभाग शिक्षक विधान परिषद मतदार संघातून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)चे उमेदवार संदीप बेडसे यांना काँग्रेस पक्षाने जाहीर पाठींबा दिला आहे. काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करून विजयी करावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 6:35 PM