मुंबई - राज्यातील विविध भागात विविध पक्ष मजबूत स्थितीत आहेत. मुंबई, कोकण, मराठवाड्यात शिवसेनेची ताकत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा गड मानला जात आहे. तर काँग्रेस विदर्भात मजबूत स्थितीत राहिलेली आहे. मात्र मागील काही वर्षांत विदर्भात भाजपने उभारी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली. मात्र आता काँग्रेस नेतृत्वाने विदर्भातील गतवैभव परत मिळविण्यासाठी रसद पुरवण्यास सुरुवात केली आहे.
2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विदर्भात चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे भाजपचे संख्याबळ पहिल्यांदा 123 वर गेले होते. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीत घरसरलेली लोकप्रियता आणि शेतकऱ्यांची विकट अवस्था यामुळे स्पर्धेत नसलेल्या काँग्रेसने पुनरागमन केले आहे. त्यामुळे विदर्भात काँग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यात विदर्भातील काँग्रेस नेते नितीन राऊत यांना संधी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात शपथ घेण्याची संधी दिल्याने पक्षाकडून राऊत यांना मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चित मानले जात आहे. त्यातच दलित चेहरा असल्यामुळे काँग्रेसला आपला सर्वसमावेशक दृष्टीकोन रुजविण्यात फायदा होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीपासून दलित मतदार काँग्रेसपासून दुरावले आहेत. वंचितने लोकसभा निवडणुकीत प्रभावी मतं घेतली होती. मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीत फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. यामुळे दलित मतदार देखील आश्वासक चेहऱ्याच्या शोधात आहेत. नितीन राऊत यांच्यामुळे दूर गेलेल्या दलित मतदारांना आपल्याकडे वळविणे काँग्रेसला सोपं होणार आहे.