"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 01:31 PM2024-11-07T13:31:45+5:302024-11-07T13:33:56+5:30
Congress Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीत मित्रपक्षांकडे गेलेल्या काही मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे.
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. ज्या काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी याबद्दलची माहिती दिली.
रमेश चेन्निथला यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
"जितके बंडखोर उमेदवार काँग्रेसच्या नावावर, काँग्रेसचे नेते उभे आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात लढत आहेत. त्या सगळ्यांना आम्ही निलंबित केले आहे. सहा वर्षांसाठी त्यांना पक्षातून काढून टाकलं आहे", असे रमेश चेन्निथला म्हणाले.
"सांगलीमध्ये अनपेक्षित घटना घडली होती. त्यासारखी कुठेही काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत नाहीये. मैत्रीपूर्ण लढत करू देणार नाही. जो नेता काँग्रेसचा बंडखोर उमेदवार असेल, त्याला निलंबित केले आहे. बंडखोर उमेदवारांची जिल्हा पातळीवर यादी करण्यास आम्ही सांगितले आहे", अशी माहिती रमेश चेन्निथला यांनी दिली.
"भाजपच्या जाहिरातीची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार"
काँग्रेस महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा केल्या आहेत. त्याबद्दल भाजपकडून जाहिराती देण्यात आल्या असून, काँग्रेस खोटं बोलत असल्याचे म्हटलं आहे.
या जाहिरातीबद्दल रमेश चेन्निथला म्हणाले, "आम्ही आज निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहोत. आम्ही दिलेल्या गॅरंटीबद्दल भाजपने सगळ्या वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत, पण त्यांचं नाव नाहीये. काही नाहीये. काही वर्तमानपत्रात आहेत. काहींमध्ये नाही, हे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करायला हवं. आम्ही तक्रार करणार आहोत", असे रमेश चेन्निथला म्हणाले.