लोकसभेतील पराभवाचा आढावा : ठाकरे घेताहेत विधानसभानिहाय बैठकानागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शहर काँग्रेस आता नव्या लढाईसाठी कामाला लागली आहे. नगरसेवक, महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार व शहर काँग्रेसचे पदाधिकारी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाचा आढावा घेतला जात आहे. विधानसभानिहाय बैठका घेण्यासही सुरुवात झाली असून भविष्यासाठी जबाबदार्या निश्चित केल्यात जात आहेत. लोकांमध्ये जास्तीत जास्त संपर्क वाढवून त्यांची कामे करा, त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करा, त्यांना पक्षाशी जोडा, असा मूलमंत्र शहर काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांंना देत आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी येत्या काळात काँग्रेसला सक्षम करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. ८ तारखेला राणीकोठी येथे सकाळी ११ वाजता मंथन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहाही विधानसभेतील नेते, पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांंंना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीच्या तयारीसाठी मंगळवारी महापालिकेत ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आता विधानसभानिहाय नगरसेवक व महापालिका निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार यांच्या बैठका घेतल्या जात असून त्यांच्याकडून ‘ग्राऊंड रिअँलिटी’ समजून घेतली जात आहे. बुधवारी दक्षिण नागपूरची बैठक पार पडली. गुरुवारी पश्चिम नागपूर व शुक्रवारी दक्षिण- पश्चिम नागपूरची बैठक आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा नगरसेवक किती मतांनी निवडून आला व लोकसभा निवडणुकीत त्या नगरसेवकाच्या प्रभागात किती मतांनी काँग्रेस मागे राहिली, याचा आढावा घेतला जात आहे. काँग्रेस मागे राहण्यासाठी नेमकी कारणे कोणती, ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे लागेल आदी मुद्यांवर सविस्तर आढावा घेतला जात आहे. सोबतच महापालिकेत कशा पद्धतीने जनतेची कामे करून मताधिक्य भरून काढता येईल, यावरही सूचना मागविल्या जात आहेत. बुधवारी दक्षिण नागपुरातील नगरसेवक व काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक पार पडली. तीत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह नगरसेवक प्रशांत धवड, तिवारी, संजय महाकाळकर, ढोके, दीपक कापसे, नयना झाडे, सुजाता कोंबाडे, निमिषा शिर्के, अमान खान, तराळे व दक्षिण नागपुरातील महापालिकेतील पराभूत उमेदवारही उपस्थित होते. (प्रतिनिधी)नगरसेवक व संघटनेत समन्वय असावा -दक्षिणच्या बैठकीत नगरसेवक व काँग्रेस पदाधिकार्यांकडे समन्वय असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रभाग अध्यक्ष व नगरसेवकांनी मिळून काम करावे. प्रभागात पालकमंत्र्यांनी दंडाधिकार्यांची त्वरित नियुक्ती करावी. पक्ष संघटनेतील बुथ कमिटी व वॉर्ड कमिट्या त्वरित नेमाव्या, आदी सूचनाही या वेळी करण्यात आल्या. कुणाला भाजप तिकीट देणार आहे का ?-लोकसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना सेट केल्याची चर्चा आहे. कोण कुणाच्या घरी कशासाठी गेले, याचीही आपल्याकडे माहिती आहे. त्यामुळे कुणाला पुढील महापालिकेची निवडणूक काँग्रेसकडून लढायची नसेल, भाजपच्या तिकिटाचे कमिटमेंट झाले असेल तर तसे मोकळेपणाने सांगा. किमान त्या प्रभागात दुसरा उमेदवार शोधून त्याला कामाला लावता येईल, अशा कानपिचक्याही विकास ठाकरे यांनी उपस्थितांना दिल्या.
काँग्रेसने घेतला धडा, चला जनतेकडे वळा !
By admin | Published: June 05, 2014 1:01 AM