नामांतरावरून पुन्हा आघाडीत कुरबुरी, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 01:16 AM2021-01-18T01:16:10+5:302021-01-18T06:58:58+5:30
औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून कॉंग्रेसवर केलेल्या टीकेला थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?
मुंबई :औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत कुरबुरी सुरूच असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी काँग्रेसच्या भूमिकेचा पुनरुच्चार करतानाच शिवसेना आणि भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. शिवसेनेला मतांची चिंता वाटत असल्यानेच त्यांनी नामांतराचा सामना सुरू केला आहे. तर, ढोंगीपणा हे भाजपचे वैशिष्ट्यच असल्याने त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणूनच पाहते, असा टोला थोरात यांनी लगावला.
औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून कॉंग्रेसवर केलेल्या टीकेला थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही, असा सवाल थोरात यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपने औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे; म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर
त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा आहे, असे थोरात म्हणाले.
दरम्यान, औरंगजेब तुमचा कोण लागतो, असा सवाल शिवसेनेने केला होता. यावर, छत्रपतींचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत व छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही आमची आराध्य दैवते आहेत. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शांची मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असे थोरातांनी स्पष्ट केले.
पण, महाविकास आघाडी सरकार स्थिर -
- एकीकडे नामांतरावरून
शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवितानाच महाविकास आघाडी सरकार मात्र स्थिर आणि खंबीर असल्याचा दावाही थोरातांनी केला.
- नामांतराच्या मुद्द्यावर सरकार अस्थिर होईल या भ्रमात कोणी राहू नये. एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे.
- हा कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार
आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही.