नागपुरातील राजभवनाला काँग्रेसचा ट्रॅक्टरने घेराव; केंद्रीय कृषी कायदे, इंधन दरवाढीला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 01:41 AM2021-01-17T01:41:01+5:302021-01-17T01:42:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे गुलाम झाले असून, ते आता या देशातील मजूर, शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनाच भांडवलदारांचे गुलाम करायला निघाले आहेत, अशी जाहीर टीका महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
नागपूर : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेसतर्फे नागपुरातील राजभवनाला ट्रॅक्टरसह घेराव घालण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे गुलाम झाले असून, ते आता या देशातील मजूर, शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनाच भांडवलदारांचे गुलाम करायला निघाले आहेत, अशी जाहीर टीका महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
या आंदोलनात हजारो कार्यकर्ते ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. राजभवनासमोर ‘किसान अधिकार दिन’ म्हणून सभा आयोजित करण्यात आली. सभेला संबोधित करताना थोरात पुढे म्हणाले, केंद्राचे कृषी कायदे हे नफेखोर व साठेबाजांसाठी तयार करण्यात आले आहेत. ५२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले. परंतु, केंद्र सरकारला त्यांची साधी कीवही येत नाही. केंद्राचे कायदे आपण मोडून काढू. हे आंदोलन इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, खा. बाळू धानोरकर, माणिकराव ठाकरे, आशिष दुआ यांनीही मनोगत व्यक्त करीत केंद्र सरकारला धारेवर धरले. आंदोलनात प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, चंद्रकांत हांडोरे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आ. राजू पारवे, मुज्जफ्फर हुसेन, राजेंद्र मुळक, अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी, अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, सत्यशील तांबे, प्रतिभा धानोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
राजभवनात घुसण्याचा प्रयत्न निष्फळ
बाळासाहेब थोरात यांचे भाषण सुरू असताना आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांसह राजभवनच्या मुख्य गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. राजभवनाच्या चारही बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले होते. यावेळी पोलिसांचा खडा पहारा होता.