मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांच्या वाटपाचे घोडे अडून बसल्याने या निवडणुकीसह राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे.
विधान परिषदेच्या पुणे, भंडारा-गोंदिया, जळगाव, यवतमाळ, नांदेड आणि सांगली-सातारा अशा सहा जागांसाठी निवडणूक होत असून यापैकी नांदेड, यवतमाळ आणि सांगली अशा तीन जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. मात्र, यापैकी नांदेड वळगता एकही जागा सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी नाही. नांदेडमध्ये अमर राजुरकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर यवतमाळ-संदीप बाजोरिया आणि सांगलीत प्रभाकर घारगे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जागावाटपासाठी झालेल्या दोन बैठकांमध्ये तोडगा निघालेला नाही.
राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीशी आघाडी न करता या निवडणुका स्वतंत्रपणलढवाव्यात, असा सूर काँग्रेसमध्ये उमटत असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या विभागावार मेळाव्यात कार्यकर्त्यांनी या मागणीवर जोर दिल्याचे दिसून आले.
स्वत: खा. चव्हाण हेदेखील राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास फारशे उत्सुक नाहीत. नुकतीच त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन आपले हे मत त्यांच्या कानी घातल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे हे तर पूर्वीपासूनच राष्ट्रवादीशी आघाडी करण्याच्या विरोधात आहेत. सांगली-सातारा विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास माजी मंत्री पतंगराव कदम यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. काँग्रेसकडून मोहनराव कदम यांची उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले- २०१४च्या विधानसभा निवडणुकीत जागावाटप अंतिम टप्प्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी तोडली. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. त्याची जबर किंमत पक्षाला मोजावी लागली. त्यामुळे किमान आतातरी पक्षाने वेळीच सावध होऊन राष्ट्रवादीशी संगत करू नये, असे मत एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.