हा खेळ आकड्यांचा! काँग्रेसच्या नाराजीमागचं 'खरं' कारण; ५-४-३ चं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:32 AM2020-06-18T04:32:43+5:302020-06-18T08:03:47+5:30

विधान परिषदेसाठी जागा वाढवून मागण्याची ही पद्धत नाही

congress upset over seat sharing formula for mlc | हा खेळ आकड्यांचा! काँग्रेसच्या नाराजीमागचं 'खरं' कारण; ५-४-३ चं राजकारण

हा खेळ आकड्यांचा! काँग्रेसच्या नाराजीमागचं 'खरं' कारण; ५-४-३ चं राजकारण

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : काँग्रेसचे नेते विधानपरिषेच्या समान जागेसाठी जाहीर माध्यमामध्ये जाऊन नाराजी नाट्य करण्यापेक्षा समोरासमोर बसून प्रश्न का सोडवत नाहीत? असा सवाल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर सतत सांगूनही ऐकले जात नसेल तर असे डोस देण्याची वेळ येते असे काँग्रेस नेते म्हणत आहेत.

विधानपरिषदेच्या १२ जागांपैकी शिवसेनेला ५, राष्ट्रवादीला ४ आणि काँग्रेसला ३ जागांचा प्रस्ताव सेनेकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आला. मात्र थोरात आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकार स्थापन करतेवेळी सगळ्या जागांचे समान वाटप करण्याचे ठरल्याची आठवण करुन दिली. त्यावर समोरासमोर बसून विषय सोडवू असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. तरीही माध्यमांमधून नाराजीच्या बातम्या येतच आहेत. यावर शिवसेनेने एक ज्येष्ठ नेते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा स्वभाव दिलदार आहे. चर्चेला बसल्यावर ते चार जागा घेऊ असे सांगूनही टाकतील. मात्र माध्यमांकडे जाणे हा पर्याय नाही. विधानपरिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले होते, ते निवडून आले असते, असे थोरात म्हणत होते पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी ती निवडणूक बिनविरोध केल्याने काँग्रेसचे एका जागेचे नुकसान झाले असे काँग्रेसला वाटते.

मुख्य सचिव अजोय मेहता यांना पुन्हा मुदतवाढ देण्याला काँग्रेसचा विरोध आहे. त्यावर हा विषय ३० जूनला संपून जाईल असे त्यांना सांगण्यात आल्याचे तो नेता म्हणाला. आता काँग्रेसने निधी वाटपात असमानतेचा मुद्दा पुढे केला. राष्ट्रवादी आमदारांच्या मतदारसंघासाठी जास्त निधी दिल्याच्या तक्रारी झाल्या. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना सतत भेटतात, त्यांनी वित्त मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून असे झाले असेल तर सांगावे आणि दुरुस्त करावे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

‘आमचेही मुद्दे आहेत. ते आम्ही जाहीरपणे बोलत नाही. कोकणातर् वादळ आले. त्याच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी महसूलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी सगळ्यात आधी जायला हवे होते. मुख्यमंत्री, खा. शरद पवार जाऊन आले. नंतर पवारांनी ‘तुम्ही जाऊन आले पाहिजे’ असे सांगितल्यावर थोरात गेले’ असे सेना नेते म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख कोरोनाची साथ आल्यावर पहिले दोन महिने कुठेही बाहेरच पडले नाहीत. त्याउलट सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख बाहेर फिरताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी ९ वाजता मंत्रालयात येतात. काँग्रेसचे मंत्री बाहेर दिसत नाहीत, म्हणून आम्ही टीका करत नाहीे.

मुख्यमंत्र्यांना भेटायला काँग्रेसचे मंत्री येतात तेव्हा ते सचिवापासून जिल्हा पातळीपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्याचे विषय आणतात. परिस्थिती निवळली की बदल्या करु असे सांगितले की ते नाराज होतात, असाही सूर आहे. त्याउलट शरद पवार स्वत:हून मुख्यमंत्र्यांना फोन करुन चर्चेला येऊ का? असे विचारतात. येताना स्वत:चे टीपण आणतात. आपण काय केले होते, आता काय केले पाहिजे हे सांगतात. आजपर्यंत त्यांनी एकाही बदलीचे काम सांगितले नाही. ते भेटीची वेळ मागतात, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना बोलावून घेऊ का? असे कसे विचारायचे? असा सवाल करुन सेनेच्या नेत्याने स्पष्ट केले की, आजही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी मुख्यमंत्री ठाकरे, आदित्य ठाकरे सतत संपर्कात आहेत.

कोणी सांगितले म्हणून मी कोकणात गेलो हे चुकीचे आहे. मी सगळ्यात आधी नाशिक, आणि जवळच्या भागात गेलो. तिकडेही वादळाने नुकसान झाले होते. उर्जा मंत्री नितीन राऊत सगळ्यात आधी कोकणात गेले. त्यानंतर बाकीचे नेते तिकडे गेले. आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. चर्चेतून प्रश्न सुटतील.
- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

निधीबद्दलच्या तक्रारी असतील तर तो गेल्या सरकारच्या काळातला निधी आहे. आत्ता कुठे सरकार सुरु झाले आहे. आमचे प्रश्न आम्ही समोरासमोर बसून सोडवून घेऊ. त्यात कसलीही अडचण नाही. आम्हाला सोबत काम करण्याचा १५ वर्षाचा अनुभव आहे.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी

भाजप शिवसेनेचे सरकार असतानाही कुरबुरी होत्या. त्यात नवीन काही नाही. तीनही पक्ष आपापसात बसून चर्चेतून प्रश्न सोडवू शकतात. राहीला प्रश्न माध्यमातून काय येते त्याचा. तर ते मनाचे श्लोक आहे. त्यांना कोण थांबवणार..?
- खा. संजय राऊत, शिवसेना नेते

Web Title: congress upset over seat sharing formula for mlc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.