"काँग्रेसची पाठ सरळ व्हायला तयार नाही", महाराष्ट्रातही 'मविआ'त ठिणगी! राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:30 IST2025-01-10T11:01:33+5:302025-01-10T11:30:31+5:30
जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत झाल्याचे म्हणत विजय वडेट्टीवारांनी मविआ नेत्यांना धारेवर धरलं आहे.

"काँग्रेसची पाठ सरळ व्हायला तयार नाही", महाराष्ट्रातही 'मविआ'त ठिणगी! राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने
Mahavikas Aghadi: दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्रातही महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवारुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये घमासान सुरु झालंय. विधानसभेसाठी जागावाटपात वेळ घालवल्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी केला आहे. यावरुन आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मरगळ झटका आणि कामाला लागा असा सल्ला दिला. त्यावर प्रत्युत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभवाचा जोरदार झटका बसल्यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस आता बाहेर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं मात्र विधानसभेला त्यांनी सपाटून मार खाल्ला. तिन्ही पक्षांना मिळून ५० जागांचा आकडाही गाठता आला नाही. त्यावरुन तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद झाल्याचे पाहायला मिळालं. अशातच मविआच्या नेत्यांनी जागावाटपात वेळ वाया घालवला असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केली.
ठाकरे गट अजूनही झोपेत - अमोल कोल्हे
दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाच्या बैठकीत काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य केल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जर थोडा कमी द्यावा, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
"विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा जर दोन दिवसात सुटला असता तर आम्हाला १८ दिवस प्रचारासाठी आणि प्लॅनिंग साठी उपयोगी पडले असते. त्यामुळे आम्हाला कोणतेही प्लॅनिंग करता आले नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आम्हाला तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही, अशी अनेक कारणे पराभवासाठी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ, याचाही फटका आम्हाला विधानसभा निवडणुकीत नक्की बसला. जागा वाटपाच्या चर्चेत संजय राऊत आणि नाना पटोले हे प्रमुख होते. बैठकीची वेळ अकरा वाजेची असताना काही नेते बैठकीला दोन वाजता येत होते. मी कोणाचेही नाव घेणार नाही मात्र, या सर्व कारणांमुळे बैठकीचा वेळ लांबत होता. एकाच जागेवर वारंवार चर्चा केली गेली. त्यामुळे ही कोणाची प्लॅनिंग होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या जागेची चर्चा दोन दिवसात सांगली असती तर आम्हाला अधिकचा वेळ मिळाला असता. वीस दिवस जागा वाटपात गेले," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
बैठकीला उशीर का झाला हे वडेट्टीवारांना माहिती - संजय राऊत
"जागा वाटपाच्या चर्चेमध्ये विजय वडेट्टिवार देखील होते. त्यामुळे उशीर होण्याचे कारण त्यांना देखील माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा लांबवण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, वडेट्टीवांरांनी विदर्भातील जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असत्या, तर जागा वाटपाची चर्चा लवकर संपली असती. लोकसभा निवडणुकीतील वियजामुळे आता आम्हीच जिंकू असे कॉंग्रेसला वाटत होते. त्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकून कोणालातरी मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, आपण एकत्र लढलो पाहिजे असे आमचे मत होते. त्यामुळे जागा वाटपाला उशीर झाला याला सर्वच जबाबदार आहेत," असं संजय राऊतांनी म्हटलं.
आघाडी तुटली तर त्याची किंमत सर्वांना भोगावी लागेल
"विधानसभा निवडणूक नंतर देखील महाविकास आघाडीची अद्याप एकही बैठक झाली नाही. हे सत्य आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही, ती व्हायला हवी होती. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय राहिला नाही. मात्र, आघाडी तुटली तर त्याची किंमत सर्वांना भोगावी लागेल. काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे शंभर पेक्षा जास्त खासदार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे," असंही संजय राऊत म्हणाले.