Maharashtra Politics: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देश पातळीवर इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. यातच काँग्रेस नेते जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे.
इंडियाच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण गेले नाही, याबाबत विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, ती काही सत्यनारायणाची पूजा वगैरे नव्हती, निमंत्रण द्यायला, त्यांनी सहमती दर्शविणारे पाऊल उचलायला पाहिजे होते. ते एक पाऊल पुढे आले तर त्यांना निमंत्रण नक्कीच मिळेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
तुम्ही सोबत या, आपण एकत्र लढू
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मला वाटते की पुरोगामी विचाराच्या मंडळींनी एकत्र येणे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जातीवादी शक्तीला घालवणे महत्त्वाचे आहे. आमची प्रकाश आंबेडकरांना विनंती आहे, आवाहन आहे, सूचना आहे की, आपण एकत्र लढू. पुरोगामी विचारायला घेऊन पुढे जाऊ. महाराष्ट्रातून जातीवादी शक्तीला बाहेर घालवू, अशी साद विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकरांना घातली आहे.
दरम्यान, राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून, मुख्यमंत्र्यांनी नवीन असे काहीही केलेले नाही. जुन्या बाटलीला नवीन लेबल लावले आहे. ईडब्ल्युएस आरक्षण न मागता दिले होत तर मराठ्यांना त्याच धर्तीवर आरक्षण देण्यासाठी लाज वाटते का? असा सवाल करत आरक्षण द्यायची तुमची नियत असेल तर झटक्यात प्रश्न सुटेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.