Congress Vijay Wadettiwar News: काँग्रेची परंपरागत जागा दुसऱ्या पक्षाला गेली की, कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी असते. परंतु, ती नाराजी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिंदे गटाच्या सात खासदारांची गत काय झाली असेल, उद्धव ठाकरे भेट नाहीत, असे सांगत निघून गेले आणि आता लोकसभाही त्यांना मिळत नाही. ना घर का, ना घाट का, अशी अवस्था त्यांची झालेले आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. शिंदे गटाच्या खासदार, आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमच्या माहितीप्रमाणे शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. वस्तुस्थिती माहिती नाही. परंतु, ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आहे. याचाच अर्थ विरोधक गोंधळलेले आहेत. शिवसेना शिंदे गट गोंधळलेला आहे. अजित पवार गट गोंधळलेला आहे. भाजपाची उमेदवारी निवडीसंदर्भात दमछाक झाली आहे. भाजपावाले त्रस्त झाले आहेत. भाजपावाले ज्या उमेदवाराचे नाव विचारात घेत आहेत, तो पडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इंडिया आघाडी भाजपाचे महाराष्ट्र विजयाचे स्वप्न मातीत मिसळेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे
विदर्भात काँग्रेसला अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. हुकूमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे. त्यामुळे लोकांना भीती वाटते की, स्वतंत्र भारताचे आपण गुलाम असू. जनतेने ठरवले आहे की, भाजपाला सत्तेतून बाहेर काढायचे. गडचिरोली तर आम्ही जिंकूच, भाजपला दुसरा पर्याय मिळाला नाही. गडचिरोलीत आमचे नामदेव किरसान निवडून येतील, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, मी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहे. भंडारा-गोंदिया मध्ये उमेदवार नवखा असला तरी तो तगडा आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहे. सांगलीचा मुद्दा फार वाढवण्याची गरज नाही. ती जागा सुरुवातीपासून काँग्रेसचीच होती. सगळ्या वादात फार ताणून घ्यायचे नाही. नेतृत्वाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य राहील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.