Vijay Wadettiwar News: नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गाव पातळीवर तलाठ्याकडून करांची वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय अन्य दुष्काळी उपाययोजनांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यात महसूल कराची वसुली होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. सरकारने शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये. शेतकऱ्यांकडून वसुली करू नये. दावोसवर उधळपट्टी करताना शेतकऱ्यांचा विचार करावा, या शब्दांत काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
लेखी आदेश वेगळे आणि तोंडी आदेश वेगळे असा खेळ या सरकारने मांडला आहे. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. दुष्काळग्रस्त भागात सरकारी वसुली, वीजबिल वसुली, कर्जवसुलीला बंदी आहे. तरीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून वसुली सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंज्या सवलती आहेत. तरीही महसूल वसुली, कर्जवसुलीचा तगादा लावला जात आहे. अशा संवेदना गमावलेल्या सरकारला शेतकऱ्यांनी जागा दाखवावी, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
दावोसवर ३४ कोटींची उधळण, बळीराजाकडून मात्र वसुली
राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाकडून करवसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सरकार एकीकडे दावोसवर ३४ कोटींची उधळण करत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून वसुली सुरु आहे. यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाने करवसुली तात्काळ थांबवावी, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.
दरम्यान, ५० लोकांचा ताफा सोबतीला आणि त्यांचा ३४ कोटींचा खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री दावोस ला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. इतके करून ही गुंतवणूक महाराष्ट्रात येणार का? की केंद्रात बसलेल्या महाशक्तीच्या ताकदीने गुजरात मध्ये जाणार? महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत तिथे राज्याचे हिताचे किती कामे होतील? दौऱ्याचा एकूण खर्च बघता हा दावोस दौरा सरकारच्या मर्जीतील अधिकारी, नेते आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींच्या पर्यटनासाठी आहे का हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.