ST Strike News: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल झाले. यातच एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार कृती समितीत एक बैठक होणार आहे. त्यात तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासह एक बैठक झाली. परंतु, ती निष्फळ ठरली. यावरून काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर निशाणा साधला. महायुती सरकारने मुंबई विकली, महाराष्ट्राची अस्मिता गुजरात दरबारी गहाण ठेवली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला व गुजरातमधील ड्रग राज्यात आणले जात आहे. पुण्यात ड्रग्ज व गोळीबार नेहमीचेच झाले आहे. पुण्याची संस्कृती नष्ट केली आहे. टेंडर काढा व कमीशन खा एवढेच काम सरकार करत आहे, या शब्दांत हल्लाबोल केला.
मविआ सरकार असताना ST संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का?
दोन दिवसापासून एस.टी. चा संप सुरु आहे. मविआ सरकार असताना एसटीच्या संपात राजकारण केले गेले. एस.टी. मंहामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी केली होती. संप चिघळवण्यासाठी भाजपाने तीन हस्तक या संपात घुसवले होते, ते आता कुठे आहेत, विलीनीकरण का केले जात नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे, दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून केले जात आहेत. सरकार व पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. पोलीस आयुक्त, डीसीपी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शिपाई या सर्व पदांची पैसे घेऊन पोस्टिंग केली जात आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीच पोस्टींग चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहराला कलंक लावणाऱ्या घटना घडत आहेत, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.