“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:39 PM2024-10-15T13:39:07+5:302024-10-15T13:40:40+5:30
Congress Vijay Wadettiwar News: महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.
Congress Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागतेय, याची वाट पाहत आहे. महायुती सरकारने राज्य विकून खाल्ले आहे. महाराष्ट्राची अस्मिता विकली आहे. महाराष्ट्रातील सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे. राज्यातील जनतेला याचा बदला घ्यायचा आहे. महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीला सक्षमतेने सामोरे जाण्याची तयारी आम्ही केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर शिक्कामोर्तब आणि झालेला शपथविधी घटनाबाह्य आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. राज्यपाल नियुक्त सात आमदारांसाठी आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली, असा आम्हाला संशय आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने घेतलेला निर्णय
मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर लहान वाहनांना संपूर्णपणे टोल माफी देण्यात आली आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गुजरातकडे अस्मिता गहाण ठेवणाऱ्यांचा बदला घेण्याची संधी आता आली आहे. पुतळ्यात कमिशन खाणाऱ्या लोकांचा बदला जनता घेईल. शेतकरी अडचणीत आला. कमिशनखोरी केली जाते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी यांनी तात्काळ बदल्या करुन घेतल्या आहेत. याआधी असे कधीच झाले नव्हते. मुख्यमंत्री हे निवडणूक काळात ही हंगामी मुख्यमंत्री असतात. नवीन सरकार येईपर्यंत ते स्टाफ बदलत नाही. जर अधिकारी यांनी बदली करुन घेतली असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली असे म्हणता येईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.