“राणाला आणायला १५ वर्षे का लागली, महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा प्रयत्न”: काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:18 IST2025-04-10T18:17:09+5:302025-04-10T18:18:12+5:30
Tahawwur Rana Extradition To India: तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

“राणाला आणायला १५ वर्षे का लागली, महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा प्रयत्न”: काँग्रेस
Tahawwur Rana Extradition To India: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर आता राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील अनेक तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आहेत. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. आताच्या घडीला राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केली. यानंतर आता पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून टीका केली आहे.
तहव्वूर राणाला आणायला १५ वर्षे का लागली?
आनंद आहे, तहव्वूर राणाला भारतात आणले असेल तर दाऊदला का आणले नाही. या बॉम्बस्फोटामागे कोण होते? हे सर्वांना माहिती आहे. जबाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला भारतात आणावे. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राणाला भारतात आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे. तहव्वूर राणाला आणायला १५ वर्षे का लागली? महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत, म्हणून आता जुमलेबाजी करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, तहव्वूर राणा याला भारतात आणले गेले आहे, याबाबत पत्रकारांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. भारताचे मोठे यश आहे. ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्याविरुद्ध कोणता खटला दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता याबद्दल बोलणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबद्दल बोलेन, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.