शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:05 IST2024-12-11T12:59:26+5:302024-12-11T13:05:18+5:30
Maharashtra Politics: गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली.

शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. खातेवाटप निश्चित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत खातेवाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकाससह गृहखात्यासाठी आग्रही असल्याने या मागणीवर काय तोडगा निघतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. शिंदे यांना गृहखात्याच्या बदल्यात महसूल खाते दिले जाऊ शकते, अशी चर्चा रंगत आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दोघांनाही दिल्लीवरच विसंबून राहावे लागेल, त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता हलणार नाही, वारंवार दयेचा अर्ज करून त्यांना तो मिळवावे लागेल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. तसेच ईव्हीएमचा घोळ आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी भारतात एकमेव आपला देश आहे ज्यात ईव्हीएम वर निवडणूक होतात. सगळे देश ईव्हीएम वर निवडणूक घेत नाहीत. जगाने ज्या गोष्टी नाकारल्या त्या आपण का करतोय, पुढच्या निवडणूक बॅलेटवर निवाडणूक झाल्या पाहिजे, बॅलेटपेपर हा अंतिम निर्णय आहे. त्यासाठी कोर्टात आम्ही दाद मागण्याची तयारी करत आहोत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
दरम्यान, गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे. या अधिवेशनात आमची एकत्र बैठक घेऊ आणि चर्चा करू, विरोधी पक्षनेतेपदाबाबत भाजपा तयार आहे का? त्यांची तयारी आहे का? हे त्यांना विचारू आणि मग पक्षनेतेपदासाठी आम्ही नाव देऊ, असे त्यांनी सांगितले.