INDIA Name: केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात वन नेशन, वन इलेक्शन यासह अन्य महत्त्वाची विधेयके सादर होऊ शकतात, अशी चर्चा आहे. यातच आता केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता विरोधकांकडून केंद्र सरकावर टीका केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंडिया ऐवजी भारत असा शब्दप्रयोग करण्याबाबत आवाहन केले होते. शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे. त्यामुळे भारत शब्द वापरावा, असे मोहन भागवत म्हणाले होते. याशिवाय भाजपविरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या नव्या आघाडीचे नाव इंडिया ठेवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपने टीका केली होती. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संविधानातून इंडिया शब्द काढण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना, रोखठोक शब्दांत भाष्य केले आहे.
भाजपचे लोक डरपोक आहेत
विरोधकांच्या इंडिया आघाडीला हे लोक घाबरले आहेत, भांबावले आहेत. भाजपचे लोक डरपोक आहेत. त्यामुळे ते विषयांना फाटे फोडण्याचे काम करत आहेत. हे लोक घमेंडीया असे संबोधतात, पण घमेंडी कोण आहे? हे देशाला माहिती आहे. इंडिया आघाडी मजबूत आहे. पण काहीही केले तरी या सरकारचे अधःपतन इंडियात झाल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधकांच्या आघाडीवर टीका करताना 'इस्ट इंडिया कंपनी', इंडियन मुजाहिद्दीन या संघटनांमध्ये 'इंडिया' नाव आहे. त्यामुळे विरोधकांची इंडिया आघाडी तशीच आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे राज्यसभा सदस्य नरेश बन्सल यांनी भारत शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरण्याची मागणी केली. भारत हा शब्द वसाहतवादी गुलामगिरीचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले होते.