“पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर”; काँग्रेसचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 11:36 AM2024-02-08T11:36:53+5:302024-02-08T11:37:12+5:30

Congress Vs State Mahayuti Govt: शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी प्रचंड चीड निर्माण झालेली असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला शेतकरी धडा शिकवेल, अशी टीका करण्यात आली आहे.

congress vijay wadettiwar criticized state and central govt over farmers issues and soybean msp | “पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर”; काँग्रेसचे टीकास्त्र

“पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर”; काँग्रेसचे टीकास्त्र

Congress Vs State Mahayuti Govt: पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी प्रचंड चीड निर्माण झालेली असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला शेतकरी धडा शिकवेल. शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेता यापुढे सोयाबीन पिकांची खरेदी केंद्रे सुरु करुन सरकारने सोयाबीनची हमी भावाने खरेदी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सोयाबीनची खरेदी जागतिक बाजार पेठेवर आधारित असल्याचे सांगितले जात असले तरी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जाऊ नये, असे अपेक्षित आहे. सोयाबीन असो की, इतर पीकांची खरेदी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने केली जात आहे. केंद्र सरकारकडून सोयाबीनचा हमीभाव अत्यंत कमी ठरविण्यात आला असून व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षाही कमी किमतीत केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च भरुन निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तरी सरकार गप्प आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. 

शेतकरी हवालदील झाला आहे

कमी खर्चात येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून किडीचा प्रादुर्भाव, निसर्गाचा असमतोलपणा, वाढलेली मजुरी, बी – बियाणे व औषधांचे चढे दर यामुळे सोयाबीन शेती परवडणारी राहिलेली नाही. त्यातच किमान आधारभूत किमतीपेक्षा  कमी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारकडून 2022-2023 मध्ये सोयाबीनचा हमीभाव प्रती क्विंटल 4 हजार 300 रुपये तर 2023-2024 मध्ये 4 हजार 600 रुपये ठरविण्यात आला होता. सोयाबीनचा उत्पादन खर्च पाहता हा हमीभाव कमीच आहे. सर्वच व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा अत्यंत कमी दरात करण्यात आली असून हे दर 4 हजार रुपयांपेक्षाही खाली आले होते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काही दिवसांपासून सोयाबीनला छत्रपती संभाजी नगर येथील बाजार समितीमध्ये 3 हजार 800 रुपये, नागपूर बाजार समितीमध्ये 4 हजार 100 रुपये प्रती क्विटंल एवढा निच्चांकी दर मिळत आहे, असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
 

Web Title: congress vijay wadettiwar criticized state and central govt over farmers issues and soybean msp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.